जीवामृत

 जीवामृत एक अद्भुत मिश्रण     

       भारताला निसर्गाने ना ना प्रकारचा आभूषणाने अलंकृत केले. ह्या आभूषणामध्ये निसर्गाने एक हिरा ही आपल्याला देशाला दिला आहे. तो हिरा म्हणजे देशी गाई. जे शेतकरी सेंद्रिय शेती करतात त्यांना देशी गाई घ्यावीच लागते. त्याशिवाय शेतीमधली कुठलीच प्रक्रिया पूर्ण होत नाही. जमीन तयार करायचा वेळेस घनजीवामृतरुपी देशी गाईचे शेणगौमूत्र वापरले जाते, बेणेप्रक्रियेसाठी बीजामृत वापरले जाते त्या मध्येही देशी गाईचे शेणगौमूत्र वापरले जाते,पीक वाढीचा अवस्थेत आले की जीवामृताचा वापर केला जातो. किटकनियंत्रण करण्यासाठी दशपर्णी अर्काचा वापर केला जातो त्यामध्येही देशी गाईचा शेणगौमूत्र असते.पिकाचा प्रत्येक अवस्थेत देशी गाईचा शेण गौमूत्राचा वापर केला जातो. आज तुम्हाला जीवामृताशी निगडित आम्ही दोन प्रयोग केले आहेत,त्यातील पहिला प्रयोग तुम्हाला सांगणार आहे.

                    आम्ही कोबी फ्लॉवरचे पीक काही वर्षांपूर्वी घेतले. ते पीक आम्ही शतप्रतिशत सेंद्रिय करण्याचा निर्णय घेतला. पिकाचा वाढीसाठी आम्ही जीवामृताचा वापर करत होतो. जीवामृताचे समीकरण पुढील प्रमाणे होते २००लिटर पाण्यामध्ये,१०किलो देशी गाईचे शेण, ५लिटर देशी गाईचे गौमूत्र,मूठभर वडाचा झाडाखालची माती,१किलो गुळ आणि १किलो बेसन. ह्या द्रावणाला आम्ही ७ दिवस आंबवत ठेवत होतो. नंतर त्या द्रावणाला जमिनीत पाण्याबरोबर सोडत होतो. त्याचे परिणाम आम्हाला चांगले मिळत होते फक्त त्यातुन आम्ही संतुष्ट नव्हतो. त्या मागचे प्रमुख कारण असे की जीवामृत सोडल्यानंतर पीक हे फक्त पुढील ७ दिवस वाढत होते. ७ दिवसानंतर त्यांचा वाढीला आळा बसत होता. आमची अपेक्षा होती की एकदा जीवामृत सोडले की किमान एक महिना झाडांची वाढ होत राहावी. पण तसं होत नव्हते. आम्ही वरचा समिकरणावर थोडे प्रयोग करायचे ठरवले. आम्ही त्यात दोन बदल केले. पहिला बदल असा की ह्या समिकरणामध्ये १०किलो देशी गाईचा शेणा ऐवजी २०किलो देशी गाईचे शेण वापरले. त्याचा फायदा असा झाला की ते द्रावण जमिनीत सोडल्यानंतर किमान एक महिना त्या झाडांची वाढ सुरू होती. ह्या मध्ये आणखी एक बदल केला तो म्हणजे बेसनचे प्रमाण जे पूर्वी १किलो होते ते कमी करून २५०ग्राम केले. त्याचे प्रमुख कारण असे की गुळ हे कर्बाचे स्त्रोत आहे आणि बेसन हे नत्राचे स्रोत आहे. त्यामुळे जर आपण गुळ आणि बेसन हे १-१किलो घातले तर कर्ब नत्र गुणोत्तर हा १:१ असा होतो. जिवाणूंची वाढ होण्यासाठी कर्ब नत्र गुणोत्तरला अनन्यसाधारण महत्त्व आहे पण १:१ ह्या गुणोत्तरा मध्ये नत्राची मात्रा जास्त होते त्या मुळे आम्ही नत्राची म्हणजे बेसनची मात्रा ही कमी करून २५०ग्राम ठेवली जेणेकरून कर्ब नत्र गुणोत्तर हा १:०.२५ म्हणजे ४:१ असा येइल. जिवाणूंची वाढ ही झपाट्याने होते. ह्या दोन बदलाअंती आम्हाला एक समीकरण हाती आले ते पुढील प्रमाणे आहे: २००लिटर पाण्यामध्ये २०किलो देशी गाईचे शेण,५लिटर गौमूत्र,मूठभर वडाचा झाडाखालची माती,१किलो गुळ आणि पाव किलो बेसन. हे समीकरण महिन्यातून एकदा जमिनीतून पाण्यावाटे पिकाला द्यावे. देशी गाईचा जीवामृतामध्ये काही महत्वाचा जिवाणू असतात हे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. बेसिलस सबटीलिस,सुडोमोनास,एसपरजीलस नायजर, ट्रायकोडर्मा,लॅक्टोबेसिलस,सॅखरोमायसिस आशा वेगवेगळ्या प्रजातीचे जिवाणू गाईचा शेणगौमूत्रा मध्ये आढळतात.शिवाय वडाचा झाडाखालची माती आपण वापरतो कारण त्या भौगोलिक परिस्थितीतले जिवाणू आपल्याला आपल्या शेता मध्ये वापरता यावेत. वडाच झाडच का?नीम किंवा जास्वंदीचा झाडाखालची माती का नाही?त्यामागचे कारण असे की वडाचे झाड हे विशाल असते त्यावर अख्या दिवसात जवळ जवळ ४०० पक्ष्यांचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष वावर असतो.पक्षी ज्यावेळी वडाचा झाडावर बसतात त्यावेळी त्यांची विष्टा झाडाखाली पडते. ह्या पक्ष्यांचा विष्टेमध्ये असणारे जिवाणू ही आपल्याला उपयोगी पडतात. 

                   आमचा शेती मध्ये आम्ही काही गोष्टी थोड्या वेगळ्या पद्धतीने केल्या आहेत. आम्ही जिवाणू खतांचा वापर झाडांचा अन्नद्रव्याचा गरजा,किंवा काही संप्रेरक निर्माण करण्यासाठी करतो आणि जीवामृत हे आमचा शेतीचा पाया म्हणून वापरतो. ह्या दोघांचा मेळ ज्या वेळी होतो त्या पीक आनंदाने डोलू लागते. हे सगळं आपण ज्या वेळी डोळ्याने बघत असतो त्या वेळी मनात समाधानाची भावना निर्माण होते. हीच भावना कालांतराने आपल्या समृद्धी कडे घेऊन जाते. 🌾🌾🌾🌾 सर्व शेतकरी मित्रांना शेर करा धन्यवाद 🙏

Comments