कांदा लागवड तंत्रज्ञान

*कांदा लागवड तंत्रज्ञान -*

*जमीन :*

पाण्याचा उत्तम निचरा होणारी हलकी ते मध्यम भारी जमीन निवडावी. 
जमिनीच्या सामू ६.५ ते ७ च्या दरम्यान असावा.
हलक्‍या, मुरमाड जमिनीत सेंद्रिय खतांचा वापर केल्यास चांगले उत्पादन मिळते. 
भारी चिकणमाती असलेल्या, पाण्याचा निचरा न होणाऱ्या तसेच चोपण किंवा खारवट जमिनीत रोपांची वाढ खुंटते, पीक चांगले पोसत नाहीत, अशा जमिनीत लागवड करू नये.
खरीप लागवडीसाठी भारी जमीन निवडू नये.

*बियाणे निवड :*
 
खरिपाच्या जातीचे बी दोन खरीप हंगामाकरिता वापरता येते. बियाणे साधारणपणे एप्रिल -मे महिन्यात तयार होते. ते लगेच जून महिन्यात वापरले जाते. काही कारणाने बी विकले गेले नाही तर पुढच्या वर्षी खरीप हंगामात वापरता येते.
रब्बीच्या जातीचे बियाणे फक्त एकाच रब्बी हंगमासाठी वापरता येते. बियाणे एप्रिल-मे महिन्यात तयार झाल्यानंतर ते येणाऱ्या रब्बी हंगामासाठी वापरावे लागते. पुढचा रब्बी हंगाम १८ महिन्यानंतर येतो. बियाणे जर चांगले ठेवले नसेल तर ते उगवत नाही.

*रोपवाटिका :*

एक हेक्‍टर कांदा लागवडीसाठी १० ते १२ गुंठे जमीन रोपवाटिका करण्यासाठी लागते.
रोपवाटिकेसाठी जागा विहिरीजवळ असावी. म्हणजे वेळच्या वेळी पाणी देणे सोपे होते.
लव्हाळा, हरळी असणारी तसेच पाणी साचणारी सखल जमीन रोपवाटिकेसाठी निवडू नये.
रोपवाटिका नेहमी स्वच्छ सूर्यप्रकाश मिळेल अशा जागी करावी. तणाची वाढ होण्याची शक्‍यता असल्यास किंवा शेणखतांमधून तण येण्याची  शक्‍यता असल्यास बियाणे पेरण्यापूर्वी वाफे भिजवून घ्यावेत. तणाचे बी उगवून आल्यानंतर खुरपणी करून बियाणे पेरावे.
रोपे गादी वाफ्यावर तयार करावीत. गादीवाफ्यावर रोपांची वाढ एकसारखी होते. मुळांच्या भोवती पाणी फार काळ साचून राहत नाही. त्यामुळे रोपे कुजत नाहीत. लागवडीच्या वेळी रोपे सहज उपटून काढता येतात. रोपांच्या गाठी जाड व लवकर तयार होतात.
गादी वाफे एक मीटर रुंद, तीन ते चार मीटर लांब करावेत. वाफ्याची उंची १५ सेंमी ठेवावी. गादीवाफे नेहमी उताराला आडवे करावेत.
वाफे तयार करताना प्रत्येक वाफ्यात दोन घमेली चांगले कुजलेले शेणखत आणि ५० ग्रॅम मिश्र खत मिसळावे, तसेच अर्धा ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रति वर्गमीटर या प्रमाणात वाफ्यात चांगल्या कुजलेल्या शेणखता बरोबरीने मिसळावे. खते आणि वाफ्यातील माती मिसळून त्यावरील दगड किंवा बारीक ढेकळे वेचून घ्यावीत. वाफा सपाट करावा.
रुंदीशी समांतर चार बोटे अंतरावर रेघा पाडाव्यात. त्यात बियाणे पातळ पेरून मातीने झाकावे. नंतर झारीने पाणी द्यावे. पाणी जेमतेम वाफ्यावर फिरेल अशा पद्धतीने द्यावे.
बियांची उगवण क्षमता चांगली असेल तर एक हेक्‍टर लागवडीसाठी सात किलो बियाणे पुरेसे होते. साधारणपणे प्रत्येक चौरस मीटरवर १० ग्रॅम बी पेरावे, म्हणजे एका वाफ्यावर ३० ग्रॅम बी पेरावे.
पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाणास २.५ ते ३ ग्रॅम थायरम किंवा कॅप्टन किंवा कार्बेन्डाझिमची प्रक्रिया करावी.
बी पेरल्यानंतर शक्‍यतो पहिले पाणी झारीने द्यावे म्हणजे बियाणे जागच्या जागी राहते; परंतु वाफ्याचे एकूणच प्रमाण जास्त असल्याने झारीने पाणी देणे शक्‍य होत नाही. अशावेळी पाटाने पाणी देणे सोयीचे ठरते. मात्र, पाणी देताना त्याचा प्रवाह कमी ठेवावा, तसेच वाफ्याच्या तोंडाशी गवताची पेंढी ठेवावी म्हणजे पाण्याचा जोर कमी होईल आणि बियाणे पाण्याबरोबर वाफ्याच्या कडेला वाहून जाणार नाही.
बी पेरल्यानंतर जमिनीचा वरचा थर सात ते आठ दिवसापर्यंत ओला असणे आवश्‍यक आहे. त्यामुळे बियांची उगवण चांगली होते. त्यानंतर पाणी बेताने ७ ते ८ दिवसांच्या अंतराने द्यावे.
तण असल्यास खुरपणी करावी. रोपांच्या ओळीमधील माती हलवून घ्यावी म्हणजे रोपांच्या मुळांभोवती हवा खेळती राहील. पुनर्लागवडीच्या अगोदर पाणी कमी करावे. त्यामुळे रोपे काटक बनतात. मात्र रोपे उपटण्यापूर्वी २४ तास अगोदर पाणी द्यावे त्यामुळे रोप काढणे सोपे होते. 
खरीप हंगामात ४० ते ५० दिवसात तर रब्बी हंगामात ५० ते ५५ दिवसात रोप तयार होते.
रोप तयार होत असताना त्यावर फुलकिडे आणि शेंडा जळणे या रोगांचा प्रादुर्भाव होतो. यांच्या नियंत्रणासाठी ऑक्सिडिमेटॉन मिथाईल १५ मि.लि. आणि २५ ग्रॅम मॅंकोझेब प्रति १० लिटर पाण्यात मिसळून १०ते १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. या द्रावणात सर्फेक्‍टंट मिसळावा.

*रोपवाटिकेसाठी ठिबक, तुषार सिंचन :*

ठिबक किंवा तुषार सिंचनावर रोपवाटिका तयार करण्यासाठी ट्रॅक्‍टरच्या साहाय्याने एक मीटर रुंद, ६० मीटर लांब आणि १५ सें.मी. उंचीचे गादीवाफे तयार करावेत. त्यावर ठिबक सिंचनाच्या दोन लॅटरल ६० सें.मी. अंतरावर ओढून घ्याव्यात. लॅटरला ३० ते ४० सें.मी. अंतर ड्रीपर्स असावेत.
तुषार सिंचनासाठी दोन नोझलमध्ये तीन मीटर बाय तीन मिटर अंतर ठेवावे. 
वाफ्यावर रुंदीशी समांतर १० सें.मी. अंतरावर रेघा पाडून त्यात बियाणे पेरावे.
ठिबक किंवा तुषार सिंचनावर रोपवाटिका तयार केली तर एकरी दोन किलो बियाणे पुरते. नेहमीच्या पद्धतीमध्ये ३.५ किलो बी लागते. याशिवाय पाण्यात देखील ४० टक्के बचत होते. 

*तण नियंत्रण :*

रोपवाटिकेतील तणांच्या नियंत्रणासाठी बियाणे पेरणीनंतर वाफ्यावर पेंडिमिथॅलीन दोन मि.लि.प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 
तणनाशक फवारणीनंतर लगेच पाणी द्यावे.

*पूर्व मशागत आणि रान बांधणी :*

मध्यम भारी जमीन असल्यास लोखंडी नांगराने १५ ते २० सें.मी. खोल नांगरणी करावी, नंतर दोन-तीन कुळवाच्या पाळ्या देऊन मोठी ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत करावी.
हेक्‍टरी २५ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत कुळवणीद्वारे जमिनीत मिसळावे.
खरीप हंगामात गादीवाफ्यावर लागवड करावी.
मध्यम भारी आणि भुसभुशीत किंवा नदीकाठच्या पोयट्याच्या जमिनीत रब्बी हंगामात सपाट वाफे पद्धतीने कांद्याची लागवड करावी, कारण अशा वाफ्यातून सरी-वरंबा पद्धतीपेक्षा ३० टक्के रोपे जास्त लागतात आणि मध्यम व सारख्या आकाराचे कांदे मिळू शकतात.
वाफ्याची लांबी-रुंदी जमिनीच्या उतारावर अवलंबून  असते. १.५ ते २ मीटर रुंद आणि ४ ते ६ मीटर लांबीचे सपाट वाफे तयार करावेत. वाफ्याची लांबी जमिनीच्या उताराच्या आडव्या दिशेने असावी. जमीन जास्त चढ-उताराची असल्यास १.५ बाय ३ मीटर आकाराचे लहान वाफे तयार करावेत.
ठिबक, तुषार सिंचनासाठी रानबांधणी : 
ठिबक व तुषार सिंचन या पद्धतीने पाणी देण्यासाठी रान बांधणी वेगळ्या प्रकारे करावी लागते.
१२० सें.मी. रुंद, ४० ते ६० मीटर लांब आणि १५ सें.मी. उंचीचे गादीवाफे ट्रॅक्‍टरला जोडता येणाऱ्या सरी यंत्राने तयार करावेत.
सरीयंत्राचे फाळाची दोन टोके १६५ सें.मी. अंतरावर कायम करून ट्रॅक्‍टर चालवला तर १२० सें.मी. रुंदीचा गादी वाफा तयार होतो. वाफ्याच्या दोन्ही कडेला ४५ सें.मी. रुंदीच्या दोन सऱ्या तयार होतात. या जागेचा उपयोग फवारणी करणे, गवत काढणे, पिकांचे निरीक्षण करण्यासाठी होतो.

*पुनर्लागवड :*

सपाट वाफे किंवा सरी-वरंबे पद्धतीमध्ये पाणी देऊन रोपांची लागवड केली जाते. काही ठिकाणी कोरडी लागवड करतात. परंतु या पद्धतीत रोपांची लागवड केल्याबरोबर पाठोपाठ वाफ्यातून पाणी द्यावे. पाणी देताना रोप वाहू नये म्हणून वाफ्याच्या तोंडावर गवताची पेंडी लावून पाण्यावर नियंत्रण ठेवावे. ओली लागवड करताना पुरेसे पाणी राहील याची काळजी घ्यावी, तसेच रोपांची संख्या ठराविक असावी. 
खरीप हंगामात १० सें.मी. बाय १५ सें.मी. अंतरावर पुनर्लागवड करावी.
रब्बी हंगामात १० सें.मी. बाय १० सें.मी. किंवा १० सें.मी. बाय १५ सें.मी. अंतरावर पुनर्लागवड करावी.
रोपे लागवड करताना ती अंगठ्याने दाबू नयेत, यामुळे माना वाकड्या होऊन वाढीस वेळ लागतो.
ठिबक किंवा तुषार सिंचनावर लागवड करताना संच रोप लागवडीअगोदर सुरू करावा.  सरासरी चार सें.मी. खोलीपर्यंत ओल राहील इतपत पाणी द्यावे. दुसऱ्या दिवशी वाफ्यावर लागवड करून त्यानंतर पाणी द्यावे. 
कार्बेन्डाझिम एक ग्रॅम किंवा क्‍लोरोथॅलोनील दोन ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. या द्रावणात पुनर्लागवडीपूर्वी रोपांची मुळे १५ मिनिटे बुडवावीत. ज्या भागात फुलकिडींचा प्रादुर्भाव जास्त आहे तेथे दीड मि.ली. कार्बोसल्फान (२५ ई.सी.)  प्रति लिटर पाण्यात मिसळून या द्रावणात रोपांची मुळे दोन तास बुडवून ठेवावीत. यामुळे लागवडीनंतर २० ते २५ दिवस किडींपासून संरक्षण होते.

*तणनाशकाचा वापर :* 

रोपे लागवडीपूर्वी कोरड्या वाफ्यात १५ मि.ली. ऑक्‍सिफ्लोरफेन किंवा -पेंडीमिथॅलीन ३० मि.लि. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  तणनाशक फवारणीसाठी विशिष्ट प्रकारच्या नोझलाचा वापर करावा.
फवारणीनंतर लगेच पाणी देऊन लागवड करावी. लागवडीनंतरसुद्धा २ ते ३ दिवसांत ओल्या वाफ्यात  किंवा लागवडीनंतर ८ ते १० दिवसापर्यंत तणनाशकाची फवारणी करता येते.

*खत व्यवस्थापन :*

प्रतिहेक्‍टरी १५ टन चांगले कुजलेले शेणखत उन्हाळ्यात पसरून नांगरट करून मातीमध्ये मिसळावे.  शेणखत, हिरवळीचे खत आणि इतर पिकांची फेरपालट व्यवस्थित असेल तर सूक्ष्मद्रव्ये  उपलब्ध होतात. 
शेणखत मिसळण्यापूर्वी वीस दिवस आधी त्यामध्ये प्रतिहेक्‍टरी पाच किलो ट्रायकोडर्मा मिसळून खताच्या ढिगाला हलके ओले करून झाकून ठेवावे. त्यामुळे ट्रायकोडर्माची वाढ होते.
पिकासाठी खतांची मात्रा किती द्यायची हे जमिनीचा प्रकार, लागवडीचे हंगाम, वापरली जाणारी आणि खत देण्याच्या पद्धती यावर अवलंबून असते.माती परीक्षणानुसार खतमात्रा द्यावी.
प्रतिहेक्‍टरी ११० किलो नत्र, ४० किलो  स्फुरद, ६० किलो पालाश व ५० किलो गंधकयुक्त खते द्यावीत. यापैकी १/३ भाग नत्र, संपूर्ण स्फुरद, पालाश व गंधक लागवडीच्या वेळी आणि राहिलेले नत्र दोन हप्त्यात विभागून द्यावे.

नत्राचा पहिला हप्ता लागवडीनंतर ३० दिवसांनी आणि दुसरा त्यानंतर १५ ते २० दिवसाने द्यावा. शिफारस केलेल्या मात्रेपेक्षा नत्र खत जास्त आणि लागवडीच्या ६० दिवसानंतरसुद्धा दिल्यास कांद्याची पात जास्त वाढते, माना जाड होऊ लागतात. कांदा आकारामध्ये लहान रहातो, जोड कांद्याचे प्रमाण जास्त होते. साठवण क्षमता कमी होते.
स्फुरद जमिनीत ३ ते ४ इंच खोलीवर रोपांच्या लागवडीअगोदर द्यावे. म्हणजे नवीन मूळ तयार होईपर्यंत स्फुरद  उपलब्ध होते.
स्फुरदाच्याबरोबरीने पालाशची पूर्ण मात्रा लागवडी अगोदर द्यावी.
कांद्यामध्ये गंधकाचे प्रमाण जास्त असते आणि म्हणून कांद्यासाठी गंधकयुक्त खतांची गरज भासते.  पिकास सिंगल सुपर फास्फेट, म्युरेट ऑफ पोटॅश आणि अमोनियम सल्फेट खत दिले तर गंधक  वेगळा वापरण्याची गरज नाही. 
जस्त, लोह व मॅंगनीज या सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरजेनुसार फवारणीदेखील फायदेशीर ठरते.
खत पेरून गादी वाफे तयार करावेत. राहिलेले  नत्र तीन-चार हप्त्यांत द्यावे. 
ठिबक सिंचन असेल तर खताच्या टाकीतून युरिया द्यावा. तुषार सिंचन असेल तर वाफ्यावर युरिया फोकून द्यावा. त्यानंतर संच चालवावा.
ठिबक सिंचनातून विद्राव्य खते देता येतात.  खतांच्या मात्रा कमी प्रमाणात अधिक भागात विभागून दिल्यामुळे खतांची कार्यक्षमता वाढते. उत्पादनात २० ते ३० टक्के वाढ होते. पाण्याची ३० ते ४० टक्के बचत होते. एकसारख्या उत्पादनाची प्रतवारी मिळते. विक्रीलायक कांद्याचे प्रमाण जास्त मिळते. रोपांचे नागे पडण्याचे प्रमाण कमी होते. जमिनीत सतत वापसा रहात असल्याने जमीन भुसभुशीत राहून काढणी सोपी होते.
फॉस्फरस, पोटॅश आणि गंधक लागवडी आधी जमिनीत वाफे तयार करताना द्यावे. मात्र, नत्र देताना ते पाच ते आठ वेळा विभागून लागवडीच्या ६० दिवसांपर्यंत ठिबकमधून द्यावे.

*पाणी नियोजन :*

पाण्याचे प्रमाण आणि दोन पाळींतील अंतर हे पिकाची वाढीची अवस्था, लागवडीचा हंगाम, जमिनीचा मगदूर इत्यादी वर अवलंबून असते.
पिकाला पाणी देताना १५ सें.मी. जास्त खोलवर ओल जाईल असे पाणी देण्याची गरज नाही. सुरवातीच्या काळात पिकाला बेताचे पाणी लागते. कोरड्यात लागवड केल्यास पाठोपाठ पाणी द्यावे. कोरडी किंवा ओली लागवड केल्यानंतर दोन दिवसांनी चिंबवणी द्यावी. 
खरीप कांद्यास क्वचितच पाणी देण्याची गरज पडते. दोन पावसाच्या पाळ्यात अंतर पडले तर ठिबक किंवा तुषार सिंचनाद्वारे एक-दोन वेळा पाणी द्यावे. काढणीपूर्वी दोन आठवडे अगोदर पाणी बंद करावे. त्यामुळे कांदा पोसतो, सड कमी होते, माना जाड होत नाहीत. 
रब्बी कांद्याला ऑक्‍टोबर ते जानेवारीमध्ये ८ ते १२ दिवसांनी आणि फेब्रुवारी ते एप्रिलमध्ये ५ ते ८ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.

*काढणी :*

रांगडा किंवा रब्बी हंगामात पिकाची वाढ पूर्ण होऊन, पाने पिवळी पडून माना पडू लागल्याबरोबर काढण्यापूर्वी १५ ते २० दिवस आधी पाणी देणे बंद करावे. त्यामुळे कांदा पक्व होण्यास मदत मिळते. कांदे घट्ट होतात, वरचा पापुद्रा सुकू कांद्याला काढणीच्या वेळेस इजा होत नाही.
साठवणूकीचा विचार करता योग्य जाती निवडाव्यात. चांगली सुकवणीकरून शिफारस केलेल्या चाळीत कांदा साठवावा.

*पिकाची अतिरिक्त वाढ रोखणे :*
कसदार जमीन व खतांच्या अधिक मात्रा यामुळे कांद्याची पात वाढते, मान जाड होतात. कांदा पोसण्यास सुरवात ८० ते ९० दिवसांनंतर होते. त्यामुळे काढणी लांबते, कांदे लांबुळके निघतात. उशिरा लागवड झाली असेल तरीदेखील पानांची वाढ मर्यादेपेक्षा जास्त होते.
पानांची अतिरिक्त वाढ रोखण्यासाठी  पीक ७५ ते ९० दिवसांचे असताना क्लोरमेक्वाट क्लोराईड हे वाढ नियंत्रक एक लिटर पाण्यात ४ ते ६ मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

 
*जातींची निवड :*

*खरीप हंगाम :*
खरीप कांदा ऑक्‍टोबर ते नोव्हेंबर या महिन्यात बाजारपेठेत आणता आला तर  चांगला दर मिळतो. त्यासाठी बियाणे पेरणी एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात किंवा मे महिन्यात करून रोपांची लागवड जून-जुलैच्या पहिल्या आठवड्यात करावी.
जूनच्या पहिल्या आठवड्यात लागवड झाली तर  सप्टेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात कांदा काढणीला येतो. या काळात पाऊस नसेल तर काढणी व तात्पुरती सुकवणी चांगली होऊ शकते. 
भीमा सुपर, भीमा राज, भीमा रेड, तसेच पांढऱ्या जातीमध्ये भीमा शुभ्रा, भीमा श्‍वेता तसेच अन्य कृषी विद्यापीठ, फलोद्यान संशोधन संस्थांनी विकसित केलेल्या बसवंत ७८०, फुले समर्थ किंवा ॲग्रिफाउंड डार्क रेड, अर्का कल्याण जातींची निवड करावी. 

*रांगडा हंगाम :*
ऑगस्ट-सप्टेंबर बी पेरून रोपांची पुर्नलागवड ऑक्‍टोबर किंवा नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करावी. काढणी जानेवारी-फेब्रुवारी या महिन्यात होते.
ज्या शेतकऱ्यांना खरीपात पाण्याअभावी लागवड करता येत नाही आणि ज्याच्या विहिरीतील पाणी जेमतेम फेब्रुवारी-मार्च पर्यंतच पुरते, त्यामुळे रब्बी कांदा करता येत नसल्याने रांगडा कांद्याची लागवड करावी.
रब्बी हंगामातील किंवा खरिपातील जातींचे९ स्वतः घरी अशास्त्रीय पद्धतीने तयार केलेले बी वापरून रांगडा हंगामात लागवड केली तर डेंगळे वाढण्याची शक्‍यता जास्त असते. 
बसवंत ७८०, एन २-४-१, ॲग्रिफाउंड लाइट रेड, फुले समर्थ,भीमा सुपर,भीमा रेड, भीमा शक्ती, भीमा शुभ्रा या जातींची लागवड करावी.
एन २-४-१, ॲग्रिफाउंड लाइट रेड या जातीमध्ये रांगडा हंगामात वातावरणानुसार डेंगळे येण्याचे प्रमाण असू शकते.

*रब्बी हंगाम :*
रब्बी हंगामातील हवामानामुळे  कांद्याची प्रत चांगली असते. उत्पादन अधिक मिळते. 
ऑक्‍टोबर-नोव्हेंबर महिन्यात बियाणे पेरून रोपांची लागवड डिसेंबर किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात  करावी. 
नोव्हेंबर महिन्यात शेवटी लागवड केली तर एप्रिलमध्ये काढणी होते. पाती आणि कांद्याची सुकवण चांगली होते. सुकवलेला कांदा साठवणीत चांगला टिकतो.
लागवडीस शिफारशीत कालावधीपेक्षा उशिरा झाला तर उत्पादनात घट येते.

*जाती :* 

*लाल कांदा :* भीमा किरण, भीमा शक्ती, एन२-४-१, अर्का निकेतन, ॲग्रीफाउंड लाइट रेड.

*पिवळा कांदा :* फुले सुवर्णा, अर्का पीतांबर या जाती चांगल्या आहेत. भारतीय बाजारपेठेत पिवळ्या रंगाच्या जातींची मागणी कमी आहे, परंतु युरोपीय बाजारपेठेसाठी या जाती उपयुक्त आहेत. पिवळा रंगाची अर्ली ग्रानो ही जात मैदानी भागात रब्बी हंगामासाठी उपयुक्त आहे. 

*पांढरा कांदा :* भीमा श्‍वेता, फुले सफेद, ॲग्रीफाउंड व्हाइट.
पांढरा कांद्याची लागवड अकोला, नागपूर, अमरावती, जळगाव व धुळे जिल्ह्यात होते. 

*मल्टिप्लायर जाती :*  सी.ओ.१, सी.ओ. २, सी.ओ. ३, सी.ओ. ४, ॲग्रीफाउंड रेड, ए.डी.यू. १ या मल्टिप्लायर जाती आहेत. मल्टिप्लायर जातीमध्ये  एका रोपात ८ ते १० मध्यम ते लहान आकाराचे कांदे  मिळतात. या जातींची लागवड दक्षिण भारतात केली जाते.

*प्रक्रिया उद्योगासाठी जाती :*

पांढऱ्या कांद्यापासून वाळवलेले काप, पावडर तयार करतात. लहान आकाराचे पांढरे लोण कांदे (२० ते २५ मि.मी. व्यास) व्हिनेगार व मिठाच्या पाण्यात प्रक्रिया करून निर्यात करतात. 
प्रक्रियासाठी गोलाकार, पाढंरा रंग, विद्राव्य घनपदार्थ १५ ते १७ टक्‍यांपेक्षा जास्त, साठवणुकीत काळी बुरशी रोगाचा प्रादुर्भाव कमी असणारी, कमीत कमी २ ते ३ महिने चांगली साठवण असणारी जात निवडावी.
सध्या भारतात उपलब्ध असलेल्या पांढऱ्या जाती प्रक्रियेसाठी वापरता येतात. 
१५ टक्‍यांपेक्षा जास्त विद्राव्य पदार्थ असणाऱ्या कमी प्रकाश कालावधीत तयार होणाऱ्या जातींचे संशोधन राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन संचालनालयामध्ये सुरू आहे. 
लोणचे निर्मिती पांढरा कांद्याची जात निवडावी. 
निर्यात तसेच लोणचे निर्मितीसाठी लाल रंगाची ॲग्रिफाउंड रोज आणि अर्का बिंदू ही जात निवडावी.

*जातींची वैशिष्ट्ये :* 

*भीमा किरण :* 
कांद्यास काढणीनंतर कमी वेळात भुरकट लाल रंग येतो.
कांदे आकाराने मध्यम गोल असून, डेंगळ्यांचे प्रमाण कमी.
कांदे बारीक मानेचे, त्यातील एकूण विद्राव्य घनपदार्थाचे प्रमाण सरासरी १२ टक्के.
कांद्याची साठवणक्षमता चांगली, सहा महिन्यांपर्यंत साठविता येतात.
१३० दिवसांत काढणी.
सरासरी उत्पादन ३५ ते ४० टन प्रति हेक्‍टरी.

*भीमा शक्ती :* 
रांगडा, रब्बी या दोन्ही हंगामासाठी फायदेशीर.
काढणीनंतर आकर्षक लाल रंग.
कांदा आकाराने गोल, डेंगळे व जोड कांद्यांचे सरासरी प्रमाण दोन्ही हंगामात अत्यल्प.
एकूण विद्राव्य घनपदार्थांचे प्रमाण सरासरी ११.८ टक्के.
कांद्याची मान बारीक ते मध्यम जाडीची. रब्बी हंगामात एकाच वेळेस माना पडतात. रांगडा हंगामात सरासरी ७० टक्के कांद्याच्या माना एकाच वेळेस पडतात.
लागवडीनंतर १३० दिवसात काढणी. चांगली साठवण क्षमता.
फुलकिड्यास सहनशील जात.
रांगडा हंगामात ४० ते ४५  टन प्रति हेक्‍टरी आणि रब्बी हंगामात ३५ ते ४० टन प्रति हेक्‍टरी उत्पादन.

*भीमा श्‍वेता :* 
कांदे आकर्षक पांढऱ्या सफेद रंगाचे, आकाराने गोल.
डेंगळे व जोड कांद्याचे प्रमाण कमी.
कांदे बारीक मानेचे, एकूण विद्राव्य घनपदार्थांचे प्रमाण सरासरी ११.५ टक्के.
१२० दिवसांत काढणीस योग्य. साठवणक्षमता मध्यम, रब्बी हंगामात तीन महिन्यांपर्यंत साठवण शक्‍य.
फुलकिड्यांसाठी सहनशील.
सरासरी उत्पादन ३० ते ३५  टन प्रति हेक्‍टरी. 

*कांदा उत्पादनाची स्थिती :*

कांदा उत्पादनाच्या बाबतीत चीनचा पहिला, भारताचा दुसरा क्रमांक. भारताची उत्पादकता १५ ते १६ टन प्रति हेक्‍टरी. अमेरिकेची उत्पादकता ४८ टन प्रति हेक्‍टरी. चीनची उत्पादकता २१ टन प्रति हेक्‍टरी. 
महाराष्ट्र, ओदिशा, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, बिहार, आंध्र प्रदेश, गुजरात, मध्यप्रदेशात कांदा लागवडीचे क्षेत्र. 
महाराष्ट्रात नाशिक, पुणे, धुळे, सातारा, सोलापूर, नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर लागवड. यापैकी नाशिक जिल्ह्यात राज्याच्या ३५ ते ४० टक्के तर देशाचा एकूण १० टक्के कांदा उत्पादन.
जागतिक बाजारपेठेत भारतीय कांद्याला चांगली मागणी आहे. यासाठी प्रतवारी महत्त्वाची ठरते.

Comments